
मेष : रागावर नियंत्रण ठेवा
७ तारखेला दुपारनंतर दिनांक ८ व ९ हे संपूर्ण दोन दिवस कारण नसताना अचानक परिस्थिती अशी निर्माण होईल की, तुमचा रागाचा पारा चढेल. असे करणे तुमच्यासाठीच त्रासाचे राहील; तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा. दिवस अनुकूल नसले की असेच होत राहते हे माहीत असतानासुद्धा नियंत्रण न ठेवल्यास नुकसान तुमचेच होऊ शकते. तेव्हा एक घाव दोन तुकडे करायला जाऊ नका. धीर धरा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. अमावास्या भाग्यस्थानातून होत आहे. व्यवसायात जे काही उधारीचे व्यवहार बाकी होते ते पूर्ण होतील. नोकरदार वर्गाच्या कामकाजात पारदर्शकता येईल. राजकीय क्षेत्रात काम करण्याची उत्सुकता वाढेल. नातेवाईकांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. कुटुंबातील व्यक्तींचा आदर करा. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ दिनांक : १०, १२
महिलांसाठी : गरजेचे तेवढेच बोला.

वृषभ : समतोल राखा
षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. असे ज्या वेळी भ्रमण असते त्या वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की, सध्या आपली डाळ शिजणार नाही. तेव्हा पुढे पुढे होऊन कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करू नका. जेवढे जमणार आहे तेवढेच करा. न जमणाऱ्या गोष्टींसाठी कोणाला शब्द देऊ नका, त्यामुळे गैरसमज वाढू शकतात. तुमची भूमिका स्पष्ट असली तरी ती इतरांना आवडणार नाही. सध्या ही वेळच नाही. तेव्हा प्रत्येक गोष्टीत समतोल राखायला हवा. अमावास्या कालावधीत वादविवाद टाळा. व्यावसायिकदृष्टया धावपळ होईल. नोकरदार वर्गाचे कामात मन लागणार नाही. समाजमाध्यमांपासून लांब राहा. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा.
मन:शांती लाभेल.प्रकृती स्वास्थ्य जपा.
शुभ दिनांक : १२, १३ महिलांसाठी : भडक प्रतिक्रिया टाळा. त्याचा तुम्हालाच त्रास होइल.

मिथुन : तडजोड स्वीकारा
सध्या शुभ ग्रहांची साथ कमी आहे असे म्हटले तरी हरकत नाही. चढ-उतार असला तरी काही वाईट होणार नाही, त्यामुळे काळजी करू नका. मात्र सतर्कता बाळगावी लागेल. कोणतीही गोष्ट केव्हाही करून चालणार नाही. प्रत्येक गोष्टीत नियोजन महत्त्वाचे राहील. समोरच्याने आपले ऐकून घ्यावे ही मानसिकता पहिली बाजूला ठेवा. कारण सध्या ग्रहमान फारसे चांगले नसल्यामुळे समोरच्याला आपली बाजू पटेलच असे नाही. प्रत्येक गोष्टीत तडजोड स्वीकारलेली चांगली राहील. अमावास्या कालावधी ठीक राहील. व्यवसायात जे चालले आहे ते चांगले असे समजून पुढे चला. नोकरदार वर्गाला कामाचा ताणतणाव जाणवू लागेल. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा. कुटुंबातील सदस्यांशी बोलताना शब्द जपून वापरा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक : ७, १०
महिलांसाठी : विचाराने पुढचे पाऊल टाका.

कर्क : मन स्थिर ठेवा
दिनांक १०, ११ हे दोन दिवस शांत राहून काम करा. या दोन दिवसांत कोणाला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. त्यामुळे वातावरण बिघडू शकते. हे दोन दिवस कसे चांगले जातील. या दृष्टीनेच प्रयत्न करा. या दोन दिवसांत मन स्थिर ठेवा. कोणाकडून अपेक्षा ठेवली तर ती पूर्ण होणार नाही. तेव्हा अपेक्षा न ठेवता आपले काम आपणच करा. त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. अमावास्या षष्ठस्थानातून होत आहे. या दिवशी कोणतेही महत्त्वाचे काम करू नका. व्यावसायिकदृष्टया स्थिरता लाभेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. खर्च जपून करा. समाजसेवेमध्ये गुंतून राहाल. मुलांसाठी वेळ द्याल. घरगुती वातावरण ठीक राहील. उपासना फलद्रूप होईल. आरोग्याची काळजी घ्या. त्यात हयगय करू नका.
शुभ दिनांक : ८, ९
महिलांसाठी : मध्यस्थी करताना विचार करा.

सिंह : कायद्याचे पालन करा
दिनांक १२, १३ हे दोन दिवस कितीही शांततेने घ्यायचे ठरवले तरी तसे होणार नाही. कारण या दिवसांत रागाचा पारा किती चढेल सांगू शकत नाही. तुम्ही कोणावर अन्याय करतही नाही आणि इतरांनी केलेला तुम्हाला चालत नाही. मात्र सध्याची परिस्थिती फारशी चांगली आहे, असे नाही. तेव्हा कायद्याच्या विरोधात जाऊन कोणतेही कार्य करू नका. कायद्याचे पालन करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. अमावास्या प्रहर शुभ जाईल.
व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हे अपेक्षेपेक्षा चांगले असेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यश मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा. सार्वजनिक ठिकाणी सामूहिक गोष्टींची आवड राहील. घरगुती वातावरण ठीक राहील. द्विधा मानसिक अवस्थेतून बाहेर या. प्रकृती जपा.
शुभ दिनांक : ७, ९
महिलांसाठी : ओळखीचा फायदा करून घ्या.

कन्या : महत्त्वाचे निर्णय घ्याल
सप्ताहात सर्व दिवस चांगले असल्यामुळे बरेच काही चांगले घडू शकते. कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. सध्या आपण म्हणाल तीच पूर्व दिशा असणार आहे. जे महत्त्वाचे निर्णय घ्यायला उशीर लागत होता ते निर्णय या सप्ताहात घ्याल. थांबलेल्या कामांना गती मिळेल. ठरवून एखादे काम करायचे ठरवले तरी ते वेळेत होणार आहे. व्यवसायात चढ-उतार असला तरी फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाच्या कामातील तांत्रिक अडचणी दूर होतील. आर्थिक बाबतीत व्यवहार मार्गी लागतील.
राजकीय क्षेत्रात व्यासंग उत्तम राहील. मैत्रीचे नाते अतूट होईल. संतती सौख्य लाभेल. नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. शेजाऱ्यांची मदत मिळेल. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
शुभ दिनांक : १२, १३
महिलांसाठी : सुविधांचा उपभोग घ्याल.

तूळ : कार्य साध्य होईल
सप्ताहातील अनुकूल वातावरणामुळे चांगले बदल झालेले दिसून येतील. महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा केली जाईल. जे करार आजपर्यंत होत नव्हते ते करार पूर्णत्वाला जातील. अस्थिर वाटणाऱ्या गोष्टी स्थिर होऊ लागतील. प्रत्येक गोष्टीत स्वत:हून पुढाकार घ्याल. त्यामुळे कामातील अडथळे दूर होतील. इतरांची मदत वेळेत मिळेल. हाती घेतलेले कार्य साध्य होईल. ताणतणाव कमी झाल्यामुळे कामांमध्ये लक्ष लागेल. अमावास्या पराक्रम स्थानातून होत आहे. व्यावसायिकदृष्टया भरभराट होईल. भागीदारी व्यवसायातील करार होतील. नोकरदार वर्गाच्या कामकाजात झालेले बदल हे दिलासा देणारे असतील. आर्थिक बाबतीत चिंता मिटेल. समाजमाध्यमाद्वारे प्रसिद्धी मिळेल. घरगुती वातावरण आनंदी असेल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. मानसिक शांती मिळेल. प्रकृतीत सुधारणा होईल.
शुभ दिनांक : ७, ८
महिलांसाठी : मेहनतीचे फळ मिळेल.

वृश्चिक : यश मिळेल
दिनांक ७ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. अमावास्या धनस्थानातून होत आहे. सध्या आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे नकारात्मक विचार मनामध्ये येणार नाहीत. एखाद्या कामासाठी इतरांचा सल्ला जरी घेतला तरी तुम्हाला जे वाटते तेच तुम्ही करणार व त्या कामांमध्ये यश मिळेल. सध्या दिवस चांगले असल्यामुळे शुभ कार्याची सुरुवात होईल. व्यवसायात खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत होतील. नोकरदार वर्गाला कामाचा मोबदला चांगला मिळेल. आर्थिक बाबतीत नियोजन केल्यास पैशांची बचत होईल. राजकीय क्षेत्रात असलेला दबाव कमी होईल. कौटुंबिक वादविवाद टाळा. जोडीदाराच्या सल्ल्याने कोणतेही काम करा. धार्मिक गोष्टीतील उत्साह वाढेल. आरोग्य ठणठणीत राहील.
शुभ दिनांक : ८, ९
महिलांसाठी : सुवर्णसंधीचा लाभ घ्या.

धनू : चर्चासत्रात पडू नका
७ तारखेला दुपारनंतर दिनांक ८ व ९ हे संपूर्ण दिवस अनुकूल नाहीत. त्यामुळे सध्या शांत बसल्याशिवाय पर्याय नाही. एखादी गोष्ट नाही पटली तर सोडून द्या. राईचा पर्वत करून काहीही साध्य होणार नाही. उलट त्याचा त्रास तुम्हाला जास्त होऊ शकतो. कारण नसताना एखाद्या जुन्या गोष्टीवरून चर्चा करत बसायचे हे तुमच्यासाठी त्रासाचे असेल. तेव्हा अशा कोणत्याही चर्चासत्रात पडू नका. अमावास्या तुमच्या राशीतूनच होत आहे. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायातून जे उत्पन्न मिळणार आहे त्याची गुंतवणूक त्वरित करा. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी इतरांवर सोपवून चालणार नाही. खर्च जपून करा. समाजसेवेपासून सध्या थोडे लांब राहा. कुटुंबाची काळजी घ्या. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा.
प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ दिनांक : ७, ९
महिलांसाठी : सहनशीलता ठेवा.

मकर : भटकंती टाळा
दिनांक १०, ११ हे दोन दिवस अचानकपणे एखादी गोष्ट मनात आली आणि ती करावीशी वाटली तरी करू नका. कारण त्या गोष्टींपासून त्रास होण्याची शक्यता राहील. हे दोन दिवस शांत राहा. या कालावधीत भटकंती टाळा. कोणत्याही गोष्टीत मानसिक समाधान मिळावे असे वाटत असते त्यावेळी स्वत:तच बदल करणे योग्य असते. आपले नियम, तत्त्व तात्पुरते बाजूला ठेवल्यास हे समाधान मिळू शकते. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. ही अमावास्या मागील काही गोष्टींचे भांडण उकरून काढणारी आहे. तेव्हा अशा गोष्टींच्या आहारी जाऊच नका. व्यवसायात उलाढाल चांगली असेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. अनावश्यक खर्च टाळा. मित्र-मैत्रिणींसोबत मनोरंजन होईल. घरगुती वातावरण ठीक राहील. आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
शुभ दिनांक : ८, ९
महिलांसाठी : नियमबाह्य गोष्टी करू नका.

कुंभ : दानशूर वृत्ती राहील
दिनांक १२, १३ या दोन दिवसांत महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आपल्या वैयक्तिक गोष्टी इतरांसमोर मांडल्यामुळे आपले हसे होऊ शकते. दरवेळी मनामध्ये जे नकारात्मक विचार येतात. त्यातून काहीही साध्य होत नाही. त्यामुळे सकारात्मक विचार करायला शिका. त्यामुळे नुकसान होणार नाही. वादविवादाचा प्रसंग जरी समोर आला तरी आपला स्वर कमी ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी अतिशय शुभदायक राहील. या चांगल्या कालावधीमध्ये सुवर्णसंधी मिळेल. अमावास्या लाभस्थानातून होत आहे. या कालावधीत दानशूर वृत्ती राहील. व्यवसायात यशस्वी वाटचाल राहील. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीचे प्रस्ताव येतील. आर्थिक परिस्थिती भक्कम होईल. सार्वजनिक विकास घडेल. मित्र-मैत्रिणींची मदत अविस्मरणीय असेल. घरच्यांचा पाठिंबा राहील. आरोग्य ठीक राहील.
शुभ दिनांक : ७, ९
महिलांसाठी : धावपळ करू नका.

मीन : आर्थिक लाभ होईल
दिनांक ७ रोजीचा दुपापर्यंत असा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचे ग्रहमान अतिशय उत्तम आहे. म्हणजेच चंद्र ग्रहाचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. मागील काही दिवस त्रासाचे गेले असले तरी हा सप्ताह मात्र तो झालेला त्रास विसरायला लावणारा आहे. सध्या मनासारख्या गोष्टी होत असल्यामुळे आनंददायक वातावरण निर्माण होईल. अमावास्या कालावधीत ज्येष्ठांची मदत मिळेल. व्यवसायात मोठया प्रमाणात उलाढाल होईल. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीची जबाबदारी मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल. मुलांना हव्या असणाऱ्या गोष्टींची पूर्तता कराल. मित्र-मैत्रिणींना मदतीचा हात पुढे कराल. नातेवाईकांची ऊठबस केल्याचा फायदा होईल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य ठणठणीत राहील.
शुभ दिनांक : ८, ९
महिलांसाठी : घेतलेले निर्णय योग्य असतील.